पहिल्याच दिवशी मेट्रोत कोणीही नाही! पिकअवरला एका ट्रेनमध्ये फक्त दीडशे प्रवासी

गेले सात महिने 22 मार्चपासून बंद असलेली घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो सेवा सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळीत सुरू झाली.पहिलाच दिवस असल्याने फारच कमी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 140 फेऱ्य़ांद्वारे 6727 प्रवाशांनी मेट्रोतून सोमवारी प्रवास केला असून रात्री 8.30 वाजेपर्यंत 10 हजार प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उपनगरीय रेल्वे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांसाठी सुरू आहे. मेट्रोने मात्र सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तातडीच्या कामाशिवाय वृद्ध आणि लहान मुलांनी प्रवास टाळावा असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा कमी गर्दी आढळली. एका ट्रेनमध्ये केवळ तीनशे प्रवाशांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असताना आज पहिल्याच दिवशी एका ट्रेनमध्ये सरासरी केवळ 50 प्रवासी होते, सकाळी पिकअवरला हे प्रमाण 150 प्रवासी प्रति ट्रेन असे वाढले होते. रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असल्याने मेट्रोला कमी गर्दी झाल्याचे म्हटले जाते आहे. तसेच कार्यालयांनाही केवळ 30 टक्के कर्मचारी उपस्थिती असल्याने मेट्रोला कमी गर्दी झाल्याचे म्हटले जाते आहे. तसेच बरेच कामगार खासगी वाहनाने तसेच ओला-उबरने प्रवास करत असल्याने मेट्रोला कमी गर्दी झाल्याचे म्हटले जाते. मास्क लावून एकमेकांपासून अंतर राखून प्रवास करताना आढळले. घाटकोपर ते वर्सोवा मार्ग पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा असल्याने प्रवाशांना हा मार्ग खुला होणे फायदेशीर ठरणार आहे.

मेट्रोमध्ये प्रवेश देताना प्रत्येक प्रवाशाचे स्क्रीनिंग केले जात आहे. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या नव्या वेळेत मेट्रो धावणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा या 11 किलोमीटर लांबीच्या मार्गावर दिवसाचे 12 तास मेट्रो धावणार आहे. एका ट्रेनमध्ये केवळ तीनशे प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. एरव्ही एका ट्रेनमध्ये 1350 प्रवाशांना परवानगी असते. पूर्वी दरदिवशी 400 हून अधिक फेऱ्य़ा चालविल्या जायच्या. आता केवळ 200 फेऱ्य़ा चालविण्यात येत आहेत.

मेट्रोचे नवे नियम याप्रमाणे

मेट्रो सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे आधी स्टेशनचे प्रवेश दिला जात आहे. प्रत्येकाचे तापमान तपासण्यात येत आहे. प्लास्टिक टोकन तिकीट पद्धती बंद केली असून केवळ मोबाईल अॅप ई-तिकीट तसेच छापिल ’क्यूआर’ कोड तिकीटावर प्रवास करता येत आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी काही मोजके गेट उघडण्यात आले आहेत. ट्रेनला काही ठराविक वेळेनंतर सॅनिटाईज केले जाते आहे. नियमांचे पालन होत आहे की नाही ते पाहण्यासाठी डब्यात कर्मचारी नेमण्यात आले आहेत. डब्यातले तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सियसदरम्यान ठेवण्यात आले आहे. पूर्वी पिकअवरमध्ये तीन मिनिटांना एक फेरी व्हायची. आता साडेसहा मिनिटांत एक फेरी होत आहे. तर नॉन पिकअवरला दर साडेआठ मिनिटांना एक फेरी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या