मेट्रोविरोधात शिवसेना आक्रमक; गिरगावात तीव्र आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मेट्रो-3’ प्रकल्पामुळे गिरगावकरांना होणाऱ्या त्रासाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ट्रफिक जॅममुळे गिरगावकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. अवजड वाहनांवर बंदी घाला अन्यथा एकही वाहन ठाकूरद्वार रस्त्यावरून जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला.

गिरगावात गेल्या वर्षभरापासून मेट्रो 3 प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेडस् लावले गेल्याने रस्ते चिंचोळे झाले आहेत. त्यातच डीबी रिऑलिटी या खासगी विकासकाचेही बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी डंपरसारख्या अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. अवजड वाहनांना रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेतच परवानगी असतानाही दिवसभर त्यांची वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात धूळ उडून प्रदूषण निर्माण झाले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागला आहे.

आज सकाळी शेकडो नागरिकांनी शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली ठाकूरद्वार येथे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात उपनेते मीना कांबळी व रवींद्र मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, संतोष शिंदे, माजी नगरसेवक संपत ठाकूर, अभिजित गुरव आदी  सहभागी झाले होते. आंदोलनप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. आंदोलनानंतर मेट्रो, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱयांची नागरिकांबरोबर या प्रश्नी बैठक झाली. डंपरची वाहतूक दिवसा बंद करावी अशी नागरिकांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आली.

रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट
गिरगाव ट्रफिकमुक्त करा, डंपरला दिवसा बंदी घाला अशा जोरदार घोषणा दिल्या. त्याच दरम्यान जवळून एक डंपर जात असल्याचे पाहताच नागरिक आणखीनच संतप्त झाले. त्यांनी दगडफेक करून डंपरच्या काचा फोडल्या. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे प्रिन्सेस स्ट्रीट ते ठाकूरद्वार रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते आणि या कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशक्तीचा आज अंत झाला असे यावेळी सकपाळ यांनी सांगितले. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या वाहतूककोंडीमुळे खूप त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रोबाधित गिरगावकरांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी! शिवसेनेच्या आंदोलनानंतर एमएमआरसीएलने दिले पत्र
मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गिरगावातील सर्व रहिवाशांचे आता गिरगावातच पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे गिरगावच्या 782 कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. स्थानिकांना आहे त्याच ठिकाणी घरे मिळवून देण्यासाठी तसेच रहिवाशांना होणाऱ्या त्रासाविरोधात शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. सोमवारी मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिवसेनेच्या या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या मेट्रो रेल प्रशासनाने गिरगावकरांचे गिरगावात पुनर्वसन करणार असल्याचे पत्र दिले.

मेट्रो 3 प्रकल्प गिरगावच्या काही भागातून जातो. मेट्रोमुळे सूर्यमहल, सूर्यमहल पत्रा शेड, चंद्रमहल, तारामहल, आनंदनिकेतन, क्रांतीनगर, अनुनिकेतन या इमारतीतील 782 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पबाधितांपैकी अर्ध्या रहिवाशांचे पुनर्वसन गिरगावातच करू, तर उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन गिरगावात करण्यास मुंबई मेट्रो रेल महामंडळाने असमर्थता दर्शवली होती. काही कुटुंबांचे काळबादेवी येथे पुनर्वसन केले जाईल, असे मेट्रो प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते. सर्व गिरगावकरांचे गिरगावातच पुनर्वसन करावे, त्यांना मोठी घरे मिळावीत, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सातत्याने यशस्वी प्रयत्न केले. शिवसेनेने सातत्याने आवाज उठवला. अखेर गिरगावातील रहिवाशांचे गिरगावातच पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सुधारित आराखडा तयार करण्याचे काम नियोजन विभागातर्फे सुरू असल्याचे पत्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनने सोमवारी शिवसेनेला दिले.