म.गो.प भाजपमध्ये विलीन , भाजप आमदारांची संख्या दोनने वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यामध्ये मंगळवारी मध्यरात्री महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. गोव्यातील महाराष्ट्र गोमांतकवादी पक्षाच्या दोन आमदारांनी आपला पक्ष आपण भाजपमध्ये विलीन करत असल्याचं जाहीर केलं आहे. मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर अशी या आमदारांची नावे आहेत. या पक्षाचे एकूण 3 आमदार होते, ज्यातील दोघेजण भाजपमध्ये सामील झाले आहेत. आमच्याकडे पक्षाचे  दोन तृतीयांश सदस्य आहेत आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भाजपात विलीनीकरण आम्ही निर्णय घेतल्याचं दोन आमदारांनी गोव्याच्या विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झालं आहे. गोवा विधानसभेत 36 सदस्यांपैकी आता भाजपाचे 14 सदस्य आहेत. दीपक पावस्कर यांनी आपल्याला मंत्रीपद दिले जाणार असून आजच आपला शपथविधी असल्याचं स्वत:च जाहीर केलं आहे.

दीपक ढवळीकर हे मगोपचे अध्यक्ष आहेत. दीपक आणि त्यांचे भाऊ सुदीन हे मनमानी करत असल्यामुळे मगोपचे नेते आणि पदाधिकारी नाराज होते. सुदीन ढवळीकर हे गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मगोप ही ढवळीकरवादी पक्ष झाल्याची टीका गेल्या काही दिवसांत त्यांच्या नेत्यांकडून उघडपणे केली जात होती.

गोव्यात घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना काँग्रेसच्या सुनील कवठेकर यांनी भाजप त्यांच्या मित्र पक्षांना कशी वागणूक देतोय ते पाहा असं म्हणत भाजपवर टीका केली आहे.

मनमानी कारभाराला कंटाळलेल्या मगोपच्या 2 आमदारांनी ढवळीकर यांना दणका द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी मगोपच्या दोन आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे गेल्या बऱ्याचे दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. मनोहर आजगांवकर आणि दीपक पावस्कर यांच्या धक्कातंत्रामुळे प्रामुख्याने सुदीन ढवळीकर यांना हादरा बसणार असून त्यांच्याकडचे उपमुख्यमंत्रीपद काढून घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.