
मुंबई आणि कोकण मंडळात म्हाडाची तब्बल 124 दुकाने विक्रीअभावी धूळ खात पडली असून यामुळे प्राधिकरणाचा मोठा निधी अडकून पडला आहे. या दुकानांची विक्री करण्यासाठी किमती कमी करण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन वेळा लिलाव करूनही एखाद्या दुकानाची विक्री न झाल्यास ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
म्हाडातर्फे घरांसोबत दुकानांचीदेखील निर्मिती करण्यात येते. या दुकानांची लिलावाच्या माध्यमातून विक्री केली जाते. नुकताच म्हाडाने मुंबईतील 149 दुकानांचा लिलाव केला. त्यातील 77 दुकानांसाठी बोली न लागल्यामुळे ही दुकाने धूळ खात पडली आहेत. केवळ मुंबईच नाही तर इतर मंडळांमधीलदेखील अनेक दुकाने विक्रीविना पडून आहेत. दुकाने का विकली जात नाहीत, याचा अभ्यास केला असता या दुकानांच्या किमती जास्त असल्याचे म्हाडाच्या निदर्शनास आले. त्यामुळे दुकानांच्या किमतीचे सूत्र काय असावे यावर प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अशा ठरणार दुकानांच्या किमती
यापूर्वी म्हाडाच्या दुकानाची आधारभूत किंमत (बेस प्राईज) व्यावसायिक रेडीरेकनरच्या शंभर टक्के किंवा निवासी रेडीरेकनरच्या दोनशे टक्के यापैकी जी जास्त असेल त्यानुसार ठरवली जायची.
आता व्यावसायिक रेडीरेकनरच्या शंभर टक्के किंवा निवासी रेडीरेकनरच्या दीडशे टक्के यातील जी किंमत जास्त असेल त्यानुसार दुकानांची आधारभूत किमत ठरवली जाणार आहे. लिलावात आधारभूत किमतीपेक्षा जो सर्वाधिक बोली लावेल त्याला दुकानाचा ताबा दिला जाणार आहे.


























































