
म्हाडाच्या जागेत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई सुरू करण्यात येत आहे. मात्र अद्यापही म्हाडाच्या अनेक ठिकाणांवर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
मंत्रालय आणि विधिमंडळ कार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत काही ठिकाणी म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. म्हाडाकडे मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या जमिनींचा पुनर्विकास करण्याचे काम आले आहे. या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हाडा या पुनर्विकासाला गती देईल. खासगी विकासकाप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करण्याकडेही आमचा कल असल्याचे सामंत म्हणाले.
म्हाडाच्या इमारतींचाही पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासगी विकासक रहिवाशांना अधिक लाभाची अमिषे दाखवून पुनर्विकासाचे काम मिळवतात. मात्र नंतर 90 टक्के विकासक ही कामे रखडवतात. रहिवाशांना भाडेदेखील मिळत नाही. त्यामुळे म्हाडाने पुनर्विकास केल्यास सर्वसामान्यांची फसवणूक टळेल, असे सामंत म्हणाले. आपल्या चौदा महिन्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत म्हाडाच्या घरांच्या किमती 20 ते 30 टक्क्यांनी कमी करून घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत घरांचा कोटा वाढवणार
म्हाडाच्या कामाविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. तसा विश्वास निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला. म्हाडाच्या घरांच्या किमती काही वेळेस बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर काही ठिकाणच्या घरांच्या किमती या कमी करण्यात आल्या. त्यामुळे या घरांच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत पुढील काळात म्हाडाच्या घरांचा कोटा वाढवण्यावरही भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
























































