
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील बंद पडलेले पुनर्विकासाचे गृहनिर्माण प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडा अधिनियम 1976 मध्ये सुधारणा करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. प्रभादेवी येथील हातिसकरवाडी येथील जानकी भुवन पुनर्विकासात विकासकाने रहिवाशांची केलेल्या फसवणुकीसंदर्भात शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रश्न विचारला होता.
मागील 25 वर्षांपासून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर सरकारकडून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याबाबत तसेच हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याबाबत कोणती कारवाई करण्यात येत आहे, असा प्रश्न सदा सरवणकर यांनी केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही माहिती दिली. मेसर्स जानकी प्रॉपर्टीजला नोटीस बजावली आहे. बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी शासन स्तरावर धोरण निश्चित करण्यासाठी म्हाडाकडून सरकारला मिळालेला प्रस्ताव तसेच शासनाने 29 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या विधिमंडळातील आठ सदस्यांच्या समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने बंद पडलेले गृहनिर्माण प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याची बाब सरकारच्या विचारधीन असल्याचे मेहता यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.


























































