आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त; जून-जुलैमध्ये निघणार जाहिरात

म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहण्यासाठी खूशखबर आहे. आचारसंहिता संपताच म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त निघणार आहे. जून-जुलैमध्ये म्हाडातर्फे मुंबईतील सुमारे एक हजार घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पहाडी गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर आणि पवई या ठिकाणी अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी ही विखुरलेली घरे आहेत.

मुंबईत जागेचे भाव वाढल्याने फ्लॅटच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा वेळी सर्वसामान्यांना परवडणाऱया किमतीत घर मिळवून देण्याचे काम म्हाडा करते. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची अनेकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात म्हाडाने मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज प्राप्त झाले होते. या वर्षीदेखील मुंबईतील घरांसाठी लॉटरी काढण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.  गेल्या लॉटरीमधील 300 ते 350 शिल्लक घरांसह नवीन 700 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

अलीकडेच म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी मुंबईतील निर्माणाधीन इमारतींची पाहणी करत कामाची गती वाढवण्याची सूचना केली. तीनचार महिन्यांत ज्या इमारतीला ओसी मिळू शकेल तेथील घरांचाही समावेश लॉटरीमध्ये केला जाणार आहे. यात म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या पहाडी गोरेगाव येथील 332 अलिशान घरांचा समावेश आहे.