
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात डोंगरालगत राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रहावे लागते. या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने आता लोखंडी संरक्षक जाळी उभारण्यास सुरुवात केली असून यासाठी म्हाडा स्वनिधीतून 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सर्वेक्षण करून दरडप्रवण क्षेत्रांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही यादी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडे आली आहे. कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून 500 चौरस मीटरच्या तर वरळी आनंद नगर येथे 550 चौरस मीटरच्या जाळ्या उभारल्या आहेत. कांदिवलीच्या आदर्श नगर आणि डॉकयार्ड रोड येथे जाळ्या लावण्याचे काम सुरू असून इतरही आठ ठिकाणी जाळ्या लावण्यात येणार आहेत.


























































