अमेरिकेच्या फ्लोरिडात ‘मायकल’चा धिंगाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

बुधवारी मेक्सिकोला तडाखा दिल्यानंतर शुक्रवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या किनाऱयाला मायकल चक्रीवादळाने तडाखा दिला. विनाशकारी बॉम्ब फुटून सगळे शहर बेचिराख व्हावे, त्याप्रमाणे शेत, घर आणि दुकानांची वाताहत झाली. आतापर्यंत मृतांची संख्या 17 वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, फ्लोरिडा आणि जॉर्जियाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेट देणार असून फ्लोरिडातील 1851 नंतरचे सगळय़ात भयानक चक्रीवादळ असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

मेक्सिकोची वाताहत
मेक्सिकोच्या किनारपट्टीला बुधवारी ‘मायकल’ चक्रीवादळाने तडाखा दिल्याने त्याचे रूपांतर रणभूमीत झाले. चौथ्या दर्जाचे वादळ असल्यामुळे किनारपट्टीजवळची
वस्ती भुईसपाट झाली. ताशी 250 किलोमीटर वेगाने वाहणाऱया वाऱयांमुळे दुकाने, घर, आणि हॉटेल्स पत्त्याप्रमाणे कोसळली. मध्यवर्ती आपत्कालीन व्यवस्थापन संस्था असलेल्या ‘फेमा’नेही लोकांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट करत कमीत कमी जीवितहानी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, या राज्यांच्या किनारपट्टींची अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली.

दहा लाख लोक विजेशिवाय
मायकलचा तडाखा इतका जबरदस्त होता की, त्यामुळे फ्लोरिडा, अलबामा, जॉर्जिया, वर्जिनिया आणि कॅरोलिनातील दहा लाख घरांतील लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वर्जिनियात पाच, दक्षिण कॅरोलिनामध्ये तीन आणि जॉर्जियात एक व्यक्तीचा मृत्यू झाला.