
सामना ऑनलाईन । कराची
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही. याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, गोलंदाज प्रशिक्षक अझहर महमूद, फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर, फिटनेस ट्रेनर ग्रॅण्ट ल्युडेन यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्वांचा खेळ येथेच खल्लास झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नव्या प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचा शोध घेत आहेत.
ट्वेण्टी-20 यश, तर कसोटी, वन डे फ्लॉप शो
मिकी आर्थर यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तानने ट्वेण्टी-20 क्रिकेटमध्ये घवघवीत यश संपादन केले. या दरम्यान, पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या ट्वेण्टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला. मात्र कसोटीत पाकिस्तानला 10 सामन्यांत विजय, तर 17 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. वन डे क्रिकेटमध्येही तीच अवस्था होती. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानला 29 सामन्यांत विजय आणि 34 सामन्यांत पराभवाचा चेहरा पाहावा लागला. मात्र पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची करामत करून दाखवली हे विशेष. दरम्यान, आता मिकी आर्थर यांचे लक्ष इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाकडे लागले आहे.

























































