
जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows), मायक्रोसोफ्ट ऑफिस (Microsoft Office) किंवा मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्थानी सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने नुकताच एक इशारा जारी केला असून, या उत्पादनांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे म्हटले आहे. या त्रुटींमुळे हॅकिंगचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.
कोणत्या सिस्टमला आहे धोका?
या इशाऱ्याचा परिणाम केवळ काही विशिष्ट युजर्सपुरता मर्यादित नाही. अहवालानुसार, विंडोज १० (Windows 10) आणि विंडोज ११ (Windows 11) सह विंडोज सर्व्हरच्या अनेक आवृत्त्या प्रभावित झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, दैनंदिन कामात वापरले जाणारे ऑफिस टूल्स आणि एज ब्राउझरवरही धोक्याची टांगती तलवार आहे. यामुळे सामान्य युजर्सपासून ते मोठ्या कंपन्या आणि MSMEs पर्यंत प्रत्येकजण प्रभावित होऊ शकतो.
काय नुकसान होऊ शकते?
CERT-In नुसार, या कमतरतांचा फायदा घेऊन कोणताही सायबर हल्लेखोर तुमच्या सिस्टममध्ये स्वतःचा कोड रन करू शकतो. याशिवाय तो सिस्टमवर अधिक अधिकार मिळवून संवेदनशील माहिती चोरू शकतो किंवा संपूर्ण सिस्टम ठप्प करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, वेळेत खबरदारी न घेतल्यास तुमचा डेटा आणि डिव्हाइस दोन्ही धोक्यात येऊ शकतात.
समस्येचे मुख्य कारण काय?
इनपुट व्हेरिफिकेशनमधील कमतरता, मेमरीशी संबंधित त्रुटी आणि ॲक्सेस कंट्रोलची कमकुवत व्यवस्था ही यामागील तांत्रिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांमध्ये, संशयास्पद फाईल उघडणे किंवा चुकीच्या लिंकवर क्लिक करणे यासारखी युजरची छोटीशी चूक देखील सायबर हल्ल्याला मार्ग मोकळा करून देऊ शकते. विशेष म्हणजे, काही हल्ल्यांसाठी युजरच्या कोणत्याही अतिरिक्त परवानगीचीही गरज नसते.
ॲडमिन युजर्ससाठी अधिक धोका
जर तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये ‘ॲडमिन’ अकाउंटने लॉगिन करत असाल, तर हा धोका अधिक पटीने वाढतो. अशा परिस्थितीत हॅकरला सिस्टमवर जास्त नियंत्रण मिळू शकते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी किंवा सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असते. विशेषतः कंपन्या आणि ऑफिस नेटवर्कमध्ये याचा मोठा फटका बसू शकतो.
या गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने अपडेट्स जारी केले आहेत. त्यामुळे युजर्सनी विलंब न करता आपली सिस्टिम त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नियमित अपडेट करणे हाच सायबर धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.






























































