रत्नागिरीत पोषण आहाराचे निकृष्ठ धान्य, अधिक्षकाला गोदामच माहीत नाही

प्रातिनिधिक फोटो

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

शालेय पोषण आहाराचे धान्य अतिशय निकृष्ठ दर्जाचे असल्याचा उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत त्याचे पडसाद उमटले. जेव्हा पंचायत समिती सदस्य पोषण आहाराचे धान्य ठेवण्यात येणाऱ्या गोदामात जाण्यास निघाले तेव्हा पोषण आहार अधिक्षकाने आपल्याला गोदाम कुठे आहे हे माहीत नसल्याचे सांगितले. दर महिन्याला पोषण आहाराचे धान्य तपासतो अशी थापाबाजी करणाऱ्या या पोषण आहार अधिक्षकाची भंबेरी उडाली. या प्रकरणातून पोषण आहाराचा भ्रष्टाचार बाहेर पडला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे आणि कुवारबांव प्राथमिक शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ दर्जाचे सापडल्यानंतर सभापती विभांजली पाटील, उपसभापती शंकर सोनवडकर, सदस्य गजानन पाटील, ऋषिकेश भोंगले, मेघना पाष्टे यांच्यासह अन्य सदस्यांनी मंगळवारच्या पंचायत समित्यांच्या मासिक सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोषण आहार अधिक्षक संतोष कटाळे यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. त्यानंतर गोदाम पहाण्यासाठी सदस्य निघाले तेव्हा पोषण आहार अधिक्षक संतोष कटाळे यांना घाम फुटला. गोदाम कुठे आहे हे विचारण्यासाठी फोनाफोनी सुरु केली. पोषण आहार अधिक्षकालाच गोदाम माहित नाही हे कळताच तुम्ही तीन महिने काय करताय? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यानंतर सर्व सदस्य जिल्हापरिषद शिक्षण सभापतींना भेटले.जिल्हापरिषद शिक्षण समितीनेही पोषण आहार अधिक्षकाची खरडपट्टी काढली. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी तुमच्या घरात तुम्ही मुलांना असे धान्य खायला घालाल का? असा प्रश्न करताना निकृष्ठ दर्जाचा माल तसाच ठेऊन खुल्या बाजारातून धान्य विकत घ्या असे सांगितले. जि.प.सदस्य बाळाशेठ जाधव यांनी पोषण आहार अधिक्षकाच्या उडवाउडवीच्या उत्तराबाबत नाराजी व्यक्त केली.