प्रगतीच्या भविष्यासाठी शिवसेनेने मदतीचा हात दिला, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून लाखमोलाची मदत

मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमशानाने विकण्यासाठी तयार असलेल्या कांद्याचा चिखल केला आहे. या कांद्याच्या चिखलात स्वतःचे भविष्य शोधणाऱ्या चिमुकल्या ‘प्रगती’ची अस्वस्थता निर्ढावलेल्या सरकारला दिसली नाही; पण शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रगतीच्या भविष्यासाठी लाखमोलाची मदत करून तिच्या स्वप्नांना नवे पंख दिले!

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कांदा उत्पादकांचे बेहाल केले. विकण्यासाठी तयार असलेल्या कांद्याचा तुफान पावसाने चिखल केला. आष्टी आलुक्यातील शिंदेवाडी येथील महेश दरेकर यांनी पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच तीन एकरातील कांदा वाळवून विक्रीसाठी तयार केला होता. मात्र पावसाने 300 गोणी कांदा भिजला. या चिखलात महेश दरेकर यांची सहा वर्षांची प्रगती चांगले कांदे शोधतानाचे दृश्य पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला. ‘कांदा विकून तुला शाळेत जाण्यासाठी नवीन दफ्तर, गणवेश, पुस्तके घेऊन देतो…’ असा शब्द वडिलांनी प्रगतीला दिला होता.

अस्मानी संकटाने प्रगतीच्या स्वप्नावरच पाणी फेरले. ही बातमी पाहून शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दरेकर कुटुंबाशी संवाद साधला. प्रगतीच्या शाळेच्या खर्चाचा भार आमदार नार्वेकर यांनी उचलला. त्यासाठी तात्काळ एक लाख रुपयांची मदत दरेकर कुटुंबाच्या बँक खात्यावर जमाही केली. यामुळे दरेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाने कांद्याचा चिखल झाल्यावर आम्ही नाउमेद झालो होतो. पण आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या मदतीमुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आहे, दिलासा मिळाला आहे, असे शेतकरी महेश दरेकर म्हणाले.

मी केलेल्या मदतीने दरेकर कुटुंबाचे नुकसान भरून येणारे नाही याची मला कल्पना आहे, पण त्यांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकर यांनी दिली.