फिलिपाइन्समध्ये लष्करी विमानाला भीषण अपघात; 45 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिलिपाइन्समध्ये सैन्य दलाच्या एका विमानाचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. दक्षिण फिलिपाइन्स येथील जोलो बेटाजवळ हे विमान कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात आतापर्यंत तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला असून काही जवानांना वाचविण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या जवानांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती फिलिपाइन्सचे सैन्य दलाचे प्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली.

फिलिपाइन्सच्या सैन्य दलाच्या ताफ्यात काही वर्षांपूर्वीच सी – 130 हे विमान दाखल झाले होते. रविवारी तब्बल 85 जवान आणि इतर क्रू सदस्यांसह एकूण 92 जणांना घेऊन हे विमान डिओरो सिटी येथून निघाले होते. सुलू राज्यातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. हा अपघात झाल्यानंतर या विमानाला आग लागली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले असून जवळपास 40 जवानांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाचे प्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली.

  • विमानातील सर्व जवानांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. त्यांना येथील सागरी बेटावरील दहशतवादविरोधी पथकात तैनात करण्यात येत होते.
  • या बेटावर मुस्लिम लोकसंख्या अधिक असून याठिकाणी अबु सय्यफ ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे.