नामांकित दुधात दूषित पाण्याची भेसळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड परिसरात नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या चौघांवर कारवाई करण्यात आली. अन्न व प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई करत हजारो रुपयांचे दूध जप्त केले. मालाड परिसरात काही लोक नामांकित कंपन्यांच्या दुधात दूषित पाण्याची भेसळ करून ते आरोग्यास हानिकारक असलेल्या दुधाची विक्री करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सी बी कंट्रोल युनिटला मिळाली. त्यानुसार सी बी कंट्रोल पथकाने एफडीएच्या मदतीने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुधात भेसळ होत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी चौघेजण गोकुळ, अमूल आदी दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करताना रंगेहाथ सापडले. त्या चौघांना पकडून पुढील कारवाईसाठी मालाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.