
सामना प्रतिनिधी । मुंबई
दुधाला हमीभाव द्या या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना राज्य सरकारने आता सकारात्मक पाऊल टाकले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच ऊस पिकाप्रमाणेच ७० : ३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली.
आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने दूध दर व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांबाबत पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. त्यावेळी जानकर यांनी शिष्टमंडळाला दूध उत्पादक शेतकऱयांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल अशी ग्वाही जानकर यांनी दिली. दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी (स्कीम्ड मिल्ड पाकडर) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळात घेतला. यामुळे दूध भुकटी प्रकल्पधारक शेतकऱयांकडून अधिक दूध खरेदी करून दरही चांगला देणार आहेत, असे जानकर म्हणाले.

































































