मंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रताप, मेडिकल कॉलेजसाठी लष्कराच्या जवानासह 100 जणांच्या जमिनी हडपल्या

सिल्लोड येथे मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्तेचा गैरवापर करीत बळजबरीने लोकांच्या जमिनी हडपल्या. लष्कराचे जवान योगेश गोराडे यांच्या मालकीच्या भूखंडासह 100 जणांच्या जमिनी त्यांनी बळकावल्या असल्याचा आरोप करत कॉँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी आज विधान भवन परिसरात आंदोलन केले.

मंत्री सत्तार सत्तेच्या जोरावर लोकांना धमकावून बळजबरीने त्यांच्या जमिनी बेकायदा ताब्यात घेण्याचा सपाटा मागील काही महिन्यांपासून लावला आहे. याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या समर्थकांमार्फत त्यांच्यावर हल्ले घडवून आणतात. सत्ताधारी असल्याने ते कुणालाही जुमानासे झाले आहेत. सत्तार यांच्याकडून सिल्लोडमध्ये सुरू असलेल्या दादागिरीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात आल्याचे कैलास गोरंटय़ाल म्हणाले.

मंत्री सत्तार यांनी केलेल्या गैरकारभारांची माहिती जनतेसमोर आणून त्यावर आवाज उठविणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्यावरही सत्तार समर्थकांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यात सत्तार यांचा उल्लेख नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे गोरंटय़ाल यांनी सांगितले.