
ब्राम्हण समाजातील मुले केवळ नोकरीसाठी जात होते पण आजच्या काळात आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर उद्योग क्षेत्रात देखील ही मुले यश मिळवत आहेत. सरस्वती पूजक असणारा ब्राम्हण समाज आता उद्योग क्षेत्रात भरारी घेत असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले. शहरातील मोंढा कॉर्नर जालना रोड येथे एक्सेस पावर बॅटरीच्या विक्री व सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, ‘आता लक्ष्मीपुत्र नव्हे तर सरस्वती पुत्र आपल्या ज्ञानाच्या बळावर गरुड झेप घेतोय. बीड सारख्या ठिकाणी बॅटरीची उत्पादने सुरू झाली ही बाब खूप अभिमानाची आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात पदार्पण करत आपला तरुण वर्ग पुढे जातोय.’
विजेची गरज आता खूप नितांत होऊन बसली आहे. प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या काळात वीज स्टोरेज करून ठेवलेल्या बॅटरीची तितकीच गरज भासणार आहे. बीडच्या कौशिक धुतेकर या तरुणाने बॅटरीची कंपनी बीडमध्ये सुरू केली गुणवत्ता आणि दर्जा सांभाळला तर हीच कंपनी राज्यात आणि राज्याबाहेर नावलौकिक करेल, असे क्षीरसागर यावेळी म्हणाले.


























































