
ओडिशातील एका मंत्र्याने शनिशिंगणापूरच्या शनिदेवतेला एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण केला आहे. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीतून हा कलश तयार करण्यात आला आहे. शनी अमावास्येनिमित्त सायंकाळी होणाऱ्या आरती सोहळय़ानंतर हा कलश शनी मूर्तीसमोर विधिपूर्वक अर्पण केला जाणार आहे. वर्षातील पहिल्याच शनी अमावास्येनिमित्त शनिवारी मोठय़ा संख्येने भाविक शनिशिंगणापुरात दाखल झाले होते.
शनिदेवतेला कलश कोणत्या मंत्र्याने अर्पण केला हे कळू शकले नाही. या मंत्र्याने आपले नाव गुपित ठेवण्याची विनंती करून हा कलश दान केला आहे. शनी अमावास्येला शनिदेवतेचे दर्शन घेतल्याने दुःख आणि इतर संकटांचे निराकरण होते, असा भाविकांमध्ये दृढ समज आहे. संध्याकाळपर्यंत सात ते आठ लाख भाविकांनी शनिदेवतेचे दर्शन घेतले. शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध असलेला बर्फीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.


























































