आम्ही राजकारणासाठी अयोध्येला जात नाही तर… आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या अयोध्या दौऱ्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ”आम्ही अयोध्येला जे जात आहोत ते रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहोत. राजकारणासाठी जात नाही. अयोध्या हे आमचं शक्तीस्थान आहे. भक्तीस्थान आहे. तिथे आशिर्वाद घ्यायला जात आहोत.” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”समाजातील प्रत्येक घटकाला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहोत. महाराष्ट्र देशाची आर्थिक शक्ती आहे. या महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलो तर देश पुढे जाईल. भगवान श्री रामाचं दर्शन घ्यायला जात आहोत. महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आशिर्वाद घ्यायला चाललो आहोत. आमच्या सर्वांचं काम तुम्ही बघत आहात. महाविकास आघाडी सरकार लोकोपयोगी कामं करत आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार उद्योग या सगळ्या विभागात काम होत आहे. असं होत असताना दुसऱ्याबाजूला समाजात तेढ निर्माण कशी होईल याचं राजकारण होत आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.

”एक 31 वर्षाचा युवा म्हणून मला जाणवायला लागलं आहे. देशात बेरोजगारी असेल महागाई असेल याने हाहाकार माजला आहे. त्यावर कुणी बोलत नाहीए. 25 वर्षापूर्वी काय झालं , 30 वर्षापूर्वी काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं, कुठल्या समाजाने काय केलं, कोण बरोबर होतं कोण चुकीचं होतं. यावर भांडण करायला प्रत्येक राजकीय पक्षाला वेळ मिळाला आहे. पण पुढच्या 25 वर्षात काय होणार आहे यावर कुणी बोलत नाही. आता पण तुम्ही बघत असाल कधी अवकाळी पाऊस होतो, वादळ येतं, गारपिट होतेय, शेतकऱ्यांचे हाल होतायत. बेरोजगारी वाढत जातेय. मी हे म्हणत नाही की 25 वर्षानंतरच्या गोष्टींवर वाद घाला पण किमान चर्चा झाली पाहिजे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.