मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाई, वारंवार आढळल्यास गुन्हे दाखल करा! – उदय सामंत

माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यशस्वीरित्या राबवली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या तीन उपायांवर भर दिला पाहिजे. त्यामुळेच जिल्ह्यात मास्क न घालणार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. जे वारंवार मास्क न घालता आढळतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करा अशाही कडक सूचना दिल्याचे शिवसेना प्रवक्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज सर्व खात्याच्या प्रमुखांसोबत कोवीड आढाव्याबाबत बैठक घेतली. आतापर्यंत जिल्ह्यात 42 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. बरे होण्याचे प्रमाण 80.79 टक्के आहे आणि मृत्यूचा दरही साडेतीन टक्क्याहून खाली आला.

ते पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. सॅनिटायझर लावून हात स्वच्छ धुवावेत असे आवाहनही सामंत यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑक्सीजन प्लँट उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकाही लवकरच उपलब्ध होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या