बारावीच्या विद्यार्थ्यांनी केलं वर्गातच लग्न! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई

प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्ती काहीही करू शकतात. याचा प्रत्यय आंध्रप्रदेशमध्ये घडलेल्या एका प्रसंगावरून आला आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधल्याचं वृत्त आहे.

प्रेमात पडून केलं धाडस

द न्यूज मिनिट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशच्या राजाहमुंद्री शहरात ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली आहे. घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन असून शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत. या दोघांनीही आपल्याच वर्गात एकमेकांशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांच्या या विवाहाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मुलगा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दोरा बांधताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुलीच्या चुलत बहिणीने काढल्याची माहिती मिळत आहे. कारण, या व्हिडीओत ती मुलाला तिच्या कपाळावर कुंकू लावण्यास सांगत आहे. तसंच हे विधी लवकर आटपण्याची घाई करत आहे.

कुणीतरी यायच्या आत हे विधी संपवावेत असं ती मुलाला सांगत आहे. व्हिडीओच्या शेवटी ती नवपरिणित दांपत्याला उभं राहायला सांगतात त्याप्रमाणे एकमेकांच्या शेजारी फोटोसाठी उभं राहण्यास सांगत आहे.

हा व्हिडीओ नेमका व्हायरल कसा झाला, याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. चौकशीअंती हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला विनंती करून लवकर वर्गात आले होते, अशी माहिती मिळत आहे. व्हायरल व्हिडीओ नंतर दोन्ही विद्यार्थ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या