
गणेशोत्सव काळात मुख्यालय न सोडण्याचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे. यात स्थायी ६५० अधिकारी, कर्मचारी आणि अस्थायी १९३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मीरा-भाईंदर पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मीरा-भाईंदर महापालिकेत गणेशोत्सव काळात पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते. असे असतानाही २९ ऑगस्ट रोजी पालिकेच्या विविध विभागामधील अनेक अधिकारी आणि कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दांडी मारणाऱ्या स्थायी ६५० अधिकारी, कर्मचारी व अस्थायी १९३ कर्मचारी असे एकूण ८४३ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला.