परवानगीशिवाय फाईल नेल्याने संताप, मीरा-भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागात दोन अधिकाऱ्यांत तुफान राडा

भाईंदर कार्यालयातून परवानगीशिवाय फाईल नेल्याच्या संतापातून मीरा- भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील दोन अधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा तसेच शिवीगाळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हंसराज मेश्राम व नागेश विरकर अशी या अधिकाऱ्यांची नावे असून ते दोघेही उपमुख्य उद्यान अधीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांच्यामध्ये झालेल्या हातापायीनंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हंसराज मेश्राम हे प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 साठी उपमुख्य उद्यान अधीक्षक म्हणून काम पाहतात. तर प्रभाग क्रमांक 4, 5 व 6 साठी उद्यान उपमुख्य अधीक्षक म्हणून नागेश विरकर हे कामकाज सांभाळतात. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच वाद झाला. त्यानंतर मेश्राम यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात महापालिकेच्या लेटर हेडवर विरकर यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत मेश्राम यांनी विरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गचंडी धरली.. शर्टाचे बटण तोडले

नागेश विरकर हे शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास नगरभवन येथील कार्यालयात जाऊन तेथील फाईल तपासल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर मेश्राम यांनी कनकिया येथे जाऊन विरकर यांच्या कार्यालयातील निविदेच्या कामकाजाच्या संदर्भातील फाईली विनापरवानगी घेऊन आल्याचे म्हटले जात आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली. मेश्राम यांनी विरकर यांची गचंडी धरून त्यांच्या शर्टाचे बटण तोडून हातापायी केली होती. हा वाद आता पोलीस ठाण्यात गेला असून आयुक्तांनीही चौकशी करण्यास सांगितले आहे.