
महानगरांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच मीरा-भाईंदरच्या पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. दामिनी पथक, बीट मार्शल, सोशल मीडियाचा वापर करून तरुणींना संरक्षण देऊ केले आहे. महिलांची छेड काढाल तर याद राखा.. थेट तुरुंगात जाल, असा सज्जड दम पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिला आहे. तरुणींच्या छेडछाडीचे १३८ गुन्हे गेल्या दहा महिन्यांत दाखल झाले आहेत. त्यातील ९८ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘दामिनी पथकाची’ सुरुवात झाली. परिमंडळ १ च्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात छेडछाडीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली. दामिनी पथक शहरात पोलीस जीप व दुचाकीवर फिरत असून सर्व कॉलेज, क्लास व गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवत असल्याने रोडरोमियोंच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
…तर थेट ११२ क्रमांकावर फोन करा
मीरा-भाईंदरमधील शाळांना भेटी देऊन मुलांना गुड टच, बॅड टच याबाबत माहिती देण्यात येत आहे. शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळी पथक फिरताना दिसून येत आहे. दामिनी पथकावर कंट्रोल रूम व स्थानिक पोलीस ठाणे यांच्यामार्फत त्यांचे लोकेशन घेण्यात येते. दामिनी पथकामुळे मीरा-भाईंदर शहरात महिलांसंबंधित असणारे गुन्हे व छेडछाडीची प्रकरणे थांबविण्यास मदत होत आहे. ११२ क्रमांकावर फोन करा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांचा सज्जड दम १० महिन्यांत १३८ जणांवर गुन्हे मीरा-भाईदर शहरात परिमंडळ १ च्या अंतर्गत नवघर, मीरा रोड, काशीगाव, नयानगर, काशिमीरा, भाईंदर, उत्तन असे एकूण सात पोलीस ठाणे येतात. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपायुक्तांनी दामिनी पथक टीम तयार केली आहे.
शाळा, कॉलेज, भाजी मार्केट, बसस्टॉप या ठिकाणी छेडछाडीच्या अनेक घटना होतात. हे प्रकार होऊ नयेत व रोडरोमियोंवर तत्काळ कारवाई करता यावी यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे.





























































