
मीरा-भाईंदरकरांची पहिलीवहिली मेट्रो आज दिमाखात धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवताच दहिसर ते काशिगाव असा प्रवासही केला. भविष्यात ही मेट्रो मुंबई, ठाणे व वसई-विरारशी कनेक्ट केली जाणार आहे. दरम्यान, मेट्रो चाचणी परीक्षेत पास झाल्याने भाईंदरकरांची ट्रॅफिकच्या कोंडीतून सुटका होणार असून गारेगार प्रवास करता येणार आहे.
मेट्रो लाईन-9 ची चाचणी ट्रायल रन आज पूर्ण झाली आहे. काही मेट्रो लाईन सेवा अंधेरीपर्यंत सुरू करण्यात आल्या होत्या. त्यात आता ही सेवा सुरू झाल्यामुळे आता काशीगाव ते अंधेरीपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. मेट्रो मार्गिकेत काशीगाव, मीरागाव, पांडुरंगवाडी व दहिसर पूर्व ही चार मेट्रो स्टेशन आहेत. या मार्गिकची एकूण लांबी 4.4 किलोमीटर आहे, तर ही लाईन पुढे जाऊन मेट्रो मार्गिका-७ ला जोडली जाईल. तसेच मेट्रो मार्गिका-2 ए शीसुद्धा जोडली जाणार आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, निरंजन डावखरे, मनीषा चौधरी यांसह एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सहआयुक्त विक्रम कुमार व पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे हे उपस्थित होते.
व्हीव्हीआयपींच्या ताफ्यामुळे ट्रॅफिक जाम
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे भाईंदर ते काशीमीरा मार्गावर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कासेगाव मेट्रो स्थानक व परिसरात झेंडे लावल्याने हा परिसर विद्रुप झाला होता.