
मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाडी तब्बल दोन तास आरग स्थानकामध्ये थांबविण्यात आली. दुपारी भर उन्हात गाडी थांबल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. संतप्त प्रवाशांनी आरग स्टेशन अधीक्षकांना घेराव घालत पर्यायी इंजिन देऊन गाडी सोडण्याची मागणी केली.
मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावर नियमित धावणारी ही पॅसेंजर गाडी अनेकदा इंजिन बिघाडामुळे विलंब झाल्याची घटना घडली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी गाडीची व्यवस्था केली जात नसल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. गुरुवारी ही गाडी तब्बल दोन ते अडीच तास उशिरा कुर्डुवाडी स्थानकामध्ये पोहोचली, तर कुर्डुवाडीहून मिरज स्थानकामध्ये सायंकाळी सात वाजता पोहोचली. वास्तविक ही गाडी दुपारी तीन वाजता मिरज स्थानकामध्ये येणे अपेक्षित होते. मात्र, ही गाडी तब्बल तीन तास उशिरा आली.
मिरज-कुर्डुवाडी गाडी वारंवार उशिरा धावण्याची ही पहिलीच वेळ नसून, अनेकदा या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होत आहेत. मिरज-कुर्डुवाडी मार्गावर अद्याप तरी कुर्डुवाडी पॅसेंजर वगळता कोणतीच नियमित रेल्वे धावत नाही. तरीही इंजिनात बिघाड होत असल्याने कुर्डुवाडी गाडी उशिरा धावत आहे. त्यामुळे डेमू गाडी बदलून पूर्वीप्रमाणे पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.




























































