
नगरसेविकेला गुडिया म्हणत तोकडे कपडे परिधान केलेल्या मॉडेलची छायाचित्रे पाठवणे मुंबई पालिका अधिकाऱयाच्या चांगलेच अंगलट आले आहे. मॉडेलची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली असली तरीही आरोपीला अशी आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवण्याचा कोणताही अधिकार नाही असे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने संबंधित अधिकाऱयाला याप्रकरणी दोषी ठरवले. इतकेच नव्हे तर, त्याला तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेसह 3 हजारांचा दंड न्यायाधीशांनी ठोठावला. नरसिंग गुडे असे त्या अधिकाऱयाचे नाव आहे.
26 जानेवारी 2016 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुडे याने नगरसेविका असलेल्या महिलेला व्हॉट्सअॅवर ‘तुम्ही स्मार्ट दिसता. मला तुम्ही आवडता. तुमचे लग्न झाले आहे का? आपण उद्या भेटतोय’ तसेच गुडिया आदी 20 ते 25 मेसेज पाठवले हेते. याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केली. खटल्यादरम्यान न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपी अधिकाऱयाला झापले. न्यायाधीश म्हणाले, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत. स्त्र्ाया घरात आणि घराबाहेरही सुरक्षित नाहीत. त्यामुळे आरोपीला शिक्षा ठोठावली तरच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल व समाजासाठी हा धडा असेल. पीडितेच्या विनयशीलतेशी संबंधित हा गुन्हा असल्याने आरोपीला चांगल्या वर्तनाच्या हमीवर जामिनावर बाहेर सोडता येणार नाही. तसेच तक्रारदाराच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने तिला व्हॉट्सअॅपवर छायाचित्रे पाठविण्याचा व तिच्या खासगी आयुष्यात बाधा आणणारे कोणतेही संदेश पाठवण्याचा आरोपीला अधिकार नाही.


























































