
थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेशी संबंधित तीन न्यायाधीशांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच ही स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला इव्हिनिंग गाऊन सेगमेंट दरम्यान रॅम्पवॉक करताना मिस जमैका गॅब्रिएल हेन्री स्टेजवरून खाली पडली. या अपघातात गॅब्रिएल जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅब्रिएलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिस युनिव्हर्स जमैका ऑर्गनायझेशनने 19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर गॅब्रिएल हेन्रीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिला जवळच्या पाओलो रंगसिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. गॅब्रिएलला कोणतीही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत झाली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.


























































