
हिंदुस्थान ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मायभगिनींच्या सौभाग्याला न्याय देण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत असून पाकिस्तान अक्षरश: होरपळून निघत आहे. पाकिस्तानने गुरूवारी रात्री क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारात ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हिंदुस्थानला घाबरवण्याचं स्वप्नं पाकिस्तानने पाहिली. मात्र हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या या स्वप्नांचा चुराडा केला. यावेळी पाकिस्तानने जे क्षेपणास्त्र डागले ते दिवाळीच्या फुसक्या बारसारखे निघाले. त्यामुळे पाकड्यांप्रमाणेच त्यांची शस्त्रात्रे देखील लेचीपेची असल्याचे दिसून आहे.
पाकिस्तान गुरूवारी रात्रीपासून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ले करत होता. मात्र हिंदुस्थानी संरक्षण यंत्रणेने ही क्षेपणास्त्रे हवेतच उडवली. त्यामुळे ती क्षेपणास्त्रे कागदासारखी हवेत उडून गेली. यापैकी एक क्षेपणास्त्र पंजाबमधील भटिंडाच्या डोंगराळ भागात सापडले आहे. त्यामुळे तेथील गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस आणि इतर संरक्षण अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तो परिसर तातडीने सील केला.
Breaking – चंडीगडमध्ये सायरन वाजलं; हवाई तळावर हल्ल्याच्या शक्यतेने सुरक्षा दल सतर्क
दरम्यान, पंजाबमध्ये सापडलेल्या या क्षेपणास्त्राबाबत संरक्षण तज्ज्ञांनी भाष्य केले आहे. हे क्षेपणास्त्र एक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. जे चीनकडून खरेदी केलेल्या पाकिस्तानी जेएफ 17 या लढाऊ विमानाने डागण्यात आले आहे. कदाचित हे क्षेपणास्त्र चंदीगडवर हल्ला करण्यासाठी डागण्यात आले होते, असे ते म्हणाले.
पाकिस्तानचे क्षेपणास्त्र सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पंजाबच्या सीमावर्ती आणि संवेदनशील भागात सतर्कता वाढवली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान, गुप्तचर संस्थांनीही या घटनांचा तपास सुरू केला आहे. मात्र, या पोकळ क्षेपणास्त्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्याची खिल्ली उडवत आहेत.