कासवांसाठी ओडिशाच्या व्हीलर बेटावर क्षेपणास्त्र चाचणी थांबवली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संरक्षण संशोधन विकास या संघटनेने (DRDO) पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत क्षेपणास्त्रांची चाचणी होणार नाही असे सांगण्यात आले आहे. कासवांना प्रजनन करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचा विणीचा हंगाम सुरू झाला असून या काळात क्षेपणास्त्र चाचणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कासवांच्या संरक्षणासाठी डीआरडीओने वनविभागाशी समन्वय राहावा यासाठी एक अधिकारीही नेमण्याचे निश्चित केले आहे. गंजम, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक आणि बालासोर या ओडिशाच्या 6 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. रामनगर खारफुट क्षेत्रात समुद्रात गस्त घालण्यासाठी 10 सशस्त्र पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहे. सुमारे 6.6 लाख समुद्री कासवे गंजम जिल्ह्यातील रुशिकुल्या भागात आपला आसरा निर्माण करण्यासाठी येत असतात. हे लक्षात घेऊन ओडिशा सरकारने 1 नोव्हेंबर ते 31 मे या काळात मासेमारीवर बंदी घातली आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुशांत नंदा म्हणाले, ‘कासवांची अंडी घालण्याचे ठिकाण हे व्हीलर बेटाच्या जवळ आहे. क्षेपणास्त्र चाचणीमध्ये मोठा उजेड होतो आणि कानठळ्या बसवणारा आवाजही निर्माण होतो याचा कासवांना त्रास होऊ नये यासाठी क्षेपणास्त्र चाचणी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कासवांची ही प्रजात लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी सध्या देशभर धडपड सुरू आहे. महाराष्ट्रातील गुहागर, वेळास आणि आसपासच्या परिसरातही कासवांना त्रास होऊ नये मोठ्या प्रमाणावर या कासवांची पैदास व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतात. ही कासवे जेव्हा छोटी असतात तेव्हा त्यांची खाण्यासाठी किंवा तेलासाठी शिकार केली जाते. या कासवांची अंडी आणि अंड्याची टरफले खत म्हणून वापरली जातात. या दोन कारणांमुळे ही कासवे मारण्याचे आणि अंडी पळवण्याचे प्रमाण काही वर्षांपूर्वी वाढले होते.

ओडिशाचे मुख्य सचिव पी.के.जेना यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने ओडिशा किनारपट्टीजवळ असलेल्या व्हीलर बेटावर क्षेपणास्त्र चाचणी थांबविण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला मान्य करण्यात आला असून क्षेपणास्त्र चाचण्या पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या काळात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाडी आणि खाडीजवळील वाळूच्या पट्ट्यापर्यंत ट्रॉलर आणि मासेमारी बोटींवरून कोणी पोहोचू नये यासाठीही खबरदारीचे उपाय करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सैन्याचे जवान आणि तटरक्षक दलाकडे या भागावर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.