साताऱ्यातील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह कृष्णा नदीपात्रा आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सातारा तालुक्यातील वेणेगाव येथून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह गावाजवळीलच कृष्णा नदीपात्रात आढळून आला. मोहन गोविंद शिवणकर (वय 75) असे या संबंधिताचे नाव आहे.

मोहन शिवणकर हे शुक्रवारी गुरे घेऊन रानात गेले होते. कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या त्यांच्या शिवारात जाऊन पाहिले असता, गुरे झाडांना बांधलेली आढळली. नदीकिनारी त्यांची कपडे व चप्पल आढळली. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी कराडहून स्पीडबोड मागवून तपास सुरू केला.

‘खिदमत-ए-खल्क’चे अब्दुल सुतार, आसिफ फरास, अझिम सुतार, सोहेल सुतार, अनिल मोहिते व साहिल पठाण यांच्यासोबत नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर शिवणकर यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. या घटनेची फिर्याद शिवणकर यांचा मुलगा गजानन शिवणकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून, हवालदार पी. पी. शिंदे तपास करीत आहेत.