‘मिशन शक्ती’ यशस्वी, पण… अमेरिकेला चिंता अंतराळातील कचऱ्याची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थान केवळ जमीन, समुद्र आणि हवेतच नव्हे, तर निर्वात पोकळी असलेल्या अंतराळातही ‘स्ट्राइक’ करू शकतो हे ‘मिशनशक्ती’च्या यशाने जगाला कळून चुकले. आपल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने हिंदुस्थानने एक लाइव्ह उपग्रह पाडला. हिंदुस्थानच्या या पराक्रमाची चीनपाठोपाठ अमेरिकेनेही गंभीर दखल घेतली आहे. मिशन यशस्वी झाले, पण उपग्रह पाडल्यामुळे अंतराळात झालेल्या कचऱ्याचे काय, अशी चिंताही अमेरिकेने व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानने अंतराळातील उपग्रहाचा यशस्वीपणे भेद केल्याचे वृत्त ऐकल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील यंत्रणा दक्ष झाल्या. हिंदुस्थानबरोबर अंतराळ आणि विज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्यास अमेरिका इच्छुक असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले आणि पाडलेल्या उपग्रहामुळे अंतराळात झालेल्या कचऱ्याबाबत हिंदुस्थानने काळजी घ्यावी असेही म्हटले आहे.

दरम्यान, ऍण्टी-सॅटेलाइट ‘मिशनशक्ती’ हे अंतराळाच्या खालच्या पातळीवर करण्यात आले होते. त्यामुळे अंतराळात कचरा होणार नाही. पाडलेल्या उपग्रहाचे अवशेष काही आठवडय़ांत जमिनीवर पडतील आणि त्यासाठी आम्ही पुरेशी काळजी घेतली आहे असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. जगभरातील 53 देशांचे 6500 पेक्षा जास्त उपग्रह अंतराळात फिरत आहेत.

हा कचरा कशाचा?

  • प्रक्षेपणावेळी पृथ्वीपासून 160 किलोमीटरवर जाणारे रॉकेटचे भाग अंतराळातच राहतात.
  • अंतराळवीर स्पेस वॉक करताना त्यांच्या हातून सुटलेली उपकरणेही अंतराळात फिरत आहेत. उदा. सुनीता विल्यम्स यांचा कॅमेरा पृथ्वीभोवती फिरतोय.
  • वापरात नसलेले, निकामी झालेले, भरकटलेले उपग्रह.
  • अंतराळात कचऱ्याचे 12 कोटी 89 लाख 34 हजार तुकडे

युरोपियन स्पेस एजन्सीने दिलेल्या जानेवारी 2019 च्या आकडय़ानुसार अंतराळात एक सेंटीमीटरपेक्षाही कमी आकाराचे 12 कोटी 80 लाख तुकडे, 1 ते 10 सेंटीमीटर आकाराचे 9 लाख तुकडे आणि 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त आकाराचे 34 हजार तुकडे फिरत आहेत. या कचऱ्यामध्ये क्रू तसेच जुन्या अग्निबाणांच्या सुटय़ा भागांचा समावेश आहे. अंतराळाच्या खालच्या कक्षेत कचऱ्याचा सर्वात मोठा तुकडा 9 बाय 5 मीटर आकाराचा आहे.

विमाने मागावर होती

हिंदुस्थानच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्रावर अमेरिकेकडून नजर ठेवण्यात आली होती अशी माहितीही मिळत आहे. हिंदी महासागरातील दिएगो ग्रेशिया बेटावरील तळावरून ओडिशाच्या किनारपट्टीवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेने ‘बोइंग आरसी 135’ हे विशेष टेहळणी विमान पाठवले होते आणि या विमानाच्या सोबतीला हवेमध्येच इंधन भरण्याची क्षमता असलेले दुसरे विमानही पाठवण्यात आले होते.