
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर रविवारी एका तरुणाने हल्ला केला. या प्रकाराने नितीशकुमार यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचे उघडकीस आले आहे. पाटणा येथील बख्तियारपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाने नितीशकुमार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
तरुणाने नितीशकुमार यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न सुरू करताच सुरक्षा रक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली. नितीशकुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी हल्ला करणाऱया तरुणाला ताब्यात घेतले. शंकर असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून तो बख्तियारपूर येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नितीशकुमार हे बरह लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांच्या खासगी दौऱयावर आहेत. येथे ते आपल्या जुन्या सहकाऱयांना भेटत आहेत. रविवारी सायंकाळी ते बख्तियारपूरमध्ये शीलभद्र यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करीत होते. त्याचदरम्यान तरुण गर्दीतून थेट स्टेजवर पोहोचला व त्याने नितीशकुमार यांना धक्काबुक्की सुरू केली. तरुणाने कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला का, याचा थांगपत्ता लावण्यासाठी अधिक तपास केला जात आहे.
घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
बिहार पोलीस मुख्यालयामार्फत या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. भाजप आणि राजदनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.




























































