मिताली राजचा बीसीसीआयला पाठिंबा, टी-20 चॅलेंज अन् महिला बिग बॅश लीग एकाच वेळी

394

हिंदुस्थानातील क्रिकेट पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयपीएलचा बिगूल वाजलाय. त्याच सोबत महिलांसाठी टी-20 लीगही सुरू होणार आहे. मात्र महिलांसाठीची टी-20 लीग व ऑस्ट्रेलियातील महिलांची बिग बॅश लीग यांच्या तारखा एकाच कालावधीत येत असल्यामुळे परदेशातील महिला क्रिकेटपटूंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी हिंदुस्थानी दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने दोन्ही स्पर्धांच्या तारखांबाबत आपले मत व्यक्त करताना बीसीसीआयची बाजू मांडली आहे. ती म्हणाली, कोरोनाच्या काळात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून योग्य ते पाऊल उचलण्यात आले आहे.

महिलांची टी-20 चॅलेंज एक ते दहा नोव्हेंबर या कालावधीत दुबईत होणार असून महिलांची बिग बॅश लीग ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे. यावर एलिसा हिली, सुझी बेटस् व रचेल हेन्स या महिला क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर मिताली राज म्हणाली, सौरभ गांगुली, जय शहा, ब्रिजेश पटेल या व्यक्ती महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबाबत पटकन आपले मत व्यक्त करणे चुकीचे ठरू शकते.

कोरोनामुळे तारखा बदलाव्या लागल्या
परदेशी क्रिकेटपटूंनी महिला टी-20 स्पर्धेच्या तारखांवर नाराजी व्यक्त केलीय. त्यांनाही महिला टी-20 चॅलेंजमध्ये खेळायचे असते. बिग बॅश लीगदरम्यानच ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्यामुळे त्यांची चिंता वाढलीय. जगातील अव्वल महिला क्रिकेटपटूंचा यामध्ये सहभाग असायला हवा, मलाही हेच वाटते, पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे हे त्यांनीही समजून घ्यायला हवे. कोरोना नसते तर आयपीएल व महिला टी-20 चॅलेंज एप्रिल – मे महिन्यात पार पडले असते. बिग बॅश नेहमीप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झाले असते, असे सांगणारी मिताली राज बीसीसीआयची पाठराखण करताना दिसत आहे.

वर्ल्ड कपआधी चार मालिका
भारतरत्न सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न 22 वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पूर्ण झाले. हिंदुस्थानची अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज हिनेही वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघितले आहे. ते पूर्ण करण्यासाठी ती सज्ज होत आहे. याबाबत ती म्हणाली, कोरोनामुळे इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली असली तरी न्यूझीलंडमध्ये 2021 सालामध्ये होणाऱया वर्ल्ड कपआधी हिंदुस्थानचा संघ चार मालिकांमध्ये सहभागी होणार आहे. या मालिका दक्षिण आप्रैका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांविरुद्ध असणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला चांगला सराव करायला मिळू शकतो, असे मिताली राजला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या