मी पुन्हा पाय ठेवीन, मिचेल मार्शची धक्कादायक प्रतिक्रिया

वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो काढताना कोणताही अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. त्या फोटोमुळे मला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले तरी मी त्याकडे फार लक्ष देत नाही. मी त्याला फारसे महत्त्व देत नाही. माझ्या लेखी कसलाही अवमान नव्हता. त्यामुळे मी असे पुन्हाही करू शकतो, असे धक्कादायक मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने व्यक्त केले.

नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला नमवून सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने विश्वचषकाच्या करंडकावर पाय ठेवून काढलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पाय ठेवून विश्वचषकाचा अवमान केल्याने क्रिकेटप्रेमींनी मार्शवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेबाबत मार्शने प्रथमच आपली भावना व्यक्त केली.

शमीदेखील भडकला होता

वर्ल्ड कप ट्रॉफीचा अवमान करणारा फोटो मार्शने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हिंदुस्थानचा गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील नाराजी व्यक्त केली होती. विश्वचषक करंडकावर पाय ठेवून काढलेला फोटो माझ्यासाठी फार वेदना देऊन गेला. सर्व देश या करंडकासाठी लढत होते. हा करंडक उंचावण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, मात्र मार्शने त्या करंडकावर पाय ठेवून बसणे मला आवडले नाही, असे शमीने एका सोशल मीडियावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.