#MeToo प्रकरण भोवले! अकबर यांचा अखेर राजीनामा

52

सामना ऑनलाईन । दिल्ली

‘मी टू’ मोहिमेतंर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झालेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आज अखेर पदाचा राजीनामा दिला. माझ्याविरोधात लावलेले सर्व आरोप खोटे असून राजीनाम्यानंतर वैयक्तिकरीत्या ते खोडून काढेन. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, असे अकबर यांनी म्हटले आहे. गेल्या 15 दिवसांत त्यांच्याविरोधात 20 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरील दबाव वाढला होता. दरम्यान, अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमानी हिच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी गुरुवार, 18 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या पटियाला न्यायालयात सुरू होणार आहे.

  • आलोकनाथ यांच्याविरोधात बुधवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात विनिता नंदा यांनी लेखी तक्रार दाखल केली.
  •  ‘यशराज फिल्म’ने बिझनेस आणि क्रिएटिव्ह हेड आशीष पाटील यांची हकालपट्टी केली.
  • अभिनेत्री जयाप्रदा यांनी ‘मी टू’ म्हटले तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान थेट जेलमध्ये जातील, असे खळबळजनक विधान अमरसिंह यांनी केले.
  • संगीतकार अन्नू मलिक यांनी चुंबनाच्या बदल्यात गाणे देतो, अशी मागणी केली होती असा आरोप गायिका श्वेता पंडीत यांनी केला आहे.

मोदींच्या दबावामुळे राजीनामा
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अकबर यांच्या नावाचा विरोधक निवडणुकीत वापर करण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांना राजीमाना देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल अकबर यांची भेट घेतली होती. त्यांनी मोदी यांचा निरोप अकबर यांना सांगितल्याचे म्हटले जात आहे. पक्षाची प्रतिमा आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मोदीजी, आम्हाला न्याय द्या – विनिता नंदा
आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विनिता नंदा यांनी आता पंतप्रधानांना सोशल मीडियावर खुले पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. ‘हिंदुस्थान हा देश महिलांसाठी नाही असे सगळेच जण म्हणतात. या सगळ्यांना तुम्ही खोटे ठरवा. इथल्या प्रत्येक महिलेच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे आहात हे आता दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही पीडितांना पाठिंबा द्या. त्यांना न्याय द्या,’ असे पत्रात म्हटले आहे.

राजीनामा देण्याचा निर्णय योग्य – आठवले
नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर अकबर यांचा राजीनामा देण्याचा निर्णय योग्य असून त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची योग्य चौकशी केली जावी, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या