
आमदार अपात्रताप्रकरणी पुढील सुनावणी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्यापासून होणार आहे. उद्या दुपारी अडीच वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. मिंधे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष पहिल्यांदा नोंदवली जाणार आहे.
मिंधे गटाच्या भरत गोगावलेंसह पाच आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत हे घेणार आहेत. त्यात मिंधे गटाचे आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, दिलीप लांडे, योगेश कदम आणि खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेचा निकाल द्यायचा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनादरम्यानही सुनावणी घेतली जात आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
उलट तपासणीत प्रभू यांना 318 प्रश्न
सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अध्यक्षांसमोर सलग सुनावणी सुरू आहे. त्यात आतापर्यंत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उलट तपासणी घेतली. यात त्यांनी व्हीप, ई-मेल, शिवसेना पक्षाची घटना, शिवसेना पक्षप्रमुखांचे अधिकार, शिवसेनेचे हिंदुत्व अशा विविध मुद्दय़ांवर तब्बल 318 प्रश्न विचारले. त्यानंतर शिवसेना विधिमंडळ कार्यालयाचे सचिव विजय जोशी यांचीही साक्ष नोंदवली.
लवकरात लवकर निर्णय घेणार
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी हिवाळी अधिवेशन काळातही सुनावणी घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार असे आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. याप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश सर्वेच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
आमदार अपात्रतेसंबंधी दाखल याचिकांवर सातत्याने सुनावणी घेतली गेली. आताही संविधानातील तरतुदींनुसार कार्यवाही होईल, असे नार्वेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संविधानानुसारच कामकाज चालेल
सभागृहाचे कामकाज किंवा देश-राज्यात शासन चालवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावरच होते. आजच्या पावन दिनी मी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की, संविधानाने दिलेल्या नियम आणि तरतुदींनुसार हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालेल. संविधानाच्या तरतुदी आणि नियमांची कुठेही पायमल्ली होणार नाही. नियमांनुसार सभागृह चालवले जाईल. सर्व आमदारही संविधानाची शपथ घेऊन सभागृहात काम करत असतात, असेही नार्वेकर म्हणाले.



























































