राहटी बंधाऱ्यात पाणी असूनही परभणीकरांना निर्जळी का; आमदार राहुल पाटील यांचा सवाल

75

सामना प्रतिनिधी । परभणी

नुकतेच लोअर दुधना प्रकल्पातून परभणी शहरालगत असलेल्या राहटी बंधाऱ्यात मुबलक पाणी सोडण्यात आले. या बंधाऱ्यात आणखी तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा असताना परभणी शहर महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांना 17-18 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तारांकीतप्रश्न 18 जून रोजी उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी शहराची सध्याची लोकसंख्या साडेतीन लाख असून शासनाच्या मानकाप्रमाणे प्रतिमाणसी प्रतिदिन 135 लिटर याप्रमाणे सध्या अंदाजे प्रतिदिन 47.25 एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. शहरातील अनेक हातपंप बंद असून ते महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्त केले जात नाहीत. गावठाण भागातही महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे परभणीकरांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत सरकारने महानगरपालिका प्रशासनाविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली.

परभणी शहरास येलदरी धरणातून सोडण्यात येणारे पाणी राहटी बंधाऱ्यात अडवून तेथून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. तरी सध्या अस्तित्वावत असलेली पाणीपुरवठा योजना 18 एमएलडी जलशुद्धीकरण क्षमतेनुसार आरेखीत केली असल्याने परभणी शहरास 17-18 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. परभणी शहरात एकूण 628 विंधन विहिरी अस्तित्वात असून उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपातळी खोल जावून पाणी आटल्यामुळे विंधन विहिरी बंद आहेत. काही किरकोळ कारणास्तव बंद असलेल्या विंधन विहिरी दुरस्त करून सुरु करण्यात आल्या आहेत. शहरात ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात येत नाही, अशा भागात महानगरपालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. परभणी शहरास पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी धरणापासून परभणी शहरापर्यंत पाणी आणणारी मुख्य जलवाहिनी, 2 जलकुंभ, एक एसबीआर व 266 कि.मी. वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले असून या योजनेचे हॅड्रॉलिक टेस्टिंग प्रगती पथावर आहे. ही योजना ऑगस्ट 2019 अखेर कार्यान्वित करण्याचे परभणी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. त्याशिवाय अमृत अभियानांतर्गत 67 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ६ जलकुंभ व 166 कि.मी. वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही योजना सप्टेंबर 2019 अखेर पूर्ण होऊन दोन्ही योजनेद्वारे शासनाच्या मानकाप्रमाणे पाणीपुरवठ्यामध्ये प्रतिमाणसी प्रतिदिन 135 लिटर पाणीपुरवठा सुरळीतपणे केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या