
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त करुन महाविकास आघाडीचे सरकार राज्यावर सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील जनतेला जो शब्द दिला तो कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करतील. शेतकऱ्यांच्या हितांच्या धोरणांना प्राधान्य देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करीत आहे. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली निश्चितपणे जनतेला न्याय देईल असा विश्वास पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाईंनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना व्यक्त केला.
हिवाळी अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर आमदार शंभूराज देसाई बोलत होते. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असणारे महाविकास आघाडीचे सरकार विरोधक राज्यातील शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत कधी करणार ? शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार ? असे प्रश्न विचारत होते. पश्चिम महाराष्ट्रात एक म्हण आहे की, “पी हळद आणि हो गोरी” परंतू महिन्याभरापूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला थोडा वेळ देणे गरजेचे आहे. असे आमदार शंभूराज देसाई आपल्या भाषणात म्हणाले.
राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याकरीता तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासण्याकरीता महाविकास आघाडीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. असे सांगून पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडली यामध्ये मागील चार महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी,जनता अतिवृष्टीमुळे पिचली,नंतर महापुरामुळे पिचली यातून सावरते ना सावरते तोवर अवकाळी पावसामुळे जनतेवर, शेतकऱ्यांवर तिहेरी संकट आले. या संकटाचा सामना जनतेने केला पंरतू या संकटामधून जनतेला सावरताना त्यांना तातडीची मदत देण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी.
























































