
भाजपचे धोरण आणि राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत फडणवीस यांची स्तुती करीत असताना, ‘देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत,’ असे अजब वक्तव्य आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे. सोलापुरातील कामांच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, महिलावर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमास महिलांसह बचत गटांच्या महिला प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थसंकल्पात मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिची शिक्षणापासून लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची काळजी फडणवीस करणार आहेत. काय माहीत नाही, या वेळेस महिलांवर फिदा झाले आहेत साहेब!’’ असे सांगत, महिला बचत गट, मुंबईमध्ये बचत गटांसाठी मॉल यांसह धनगर, मराठा, लिंगायत समाजांच्या महामंडळांसाठी तरतूद केलेल्या रकमांचा उल्लेख करीत या जातींना प्राधान्य देणार असल्याचे अधोरेखित केले.
‘निर्भया’ प्रकरणात विचारपूसही नाही
सोलापूर जिह्यात ‘निर्भया’सारखे प्रकरण गाजत असताना निर्भया किंवा तिच्या कुटुंबीयांची आमदार सुभाष देशमुख यांनी साधी विचारपूसही केलेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी विकासकामांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा महिलावर्गातून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.


























































