मेट्रो मार्गात येणाऱ्या झाडांसह पक्ष्यांची घरटीही सुरक्षित ठिकाणी हलवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो रेल्वेसाठी झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट उखडून दुसरीकडे त्यांचे पुनर्रोपण करण्याचा पर्याय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्वीकारला. पण झाडे उखडताना त्यावरील पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत होती. यापुढे ती घरटीही झाडांबरोबर हलवण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 प्रकल्पात हा पर्याय अवलंबला जाणार आहे.

एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी पर्यावरणप्रेमी आणि ठाणे वन खात्याच्या सहकार्याने दोन दिवसांपूर्वी मेट्रो-4 मार्गात येणार्‍या झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यांचे सर्वेक्षण केले. पक्ष्यांना हानी न पोहोचवता झाडांचे पुनर्रोपण कसे करता येईल यासंदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी ठाणे वन खात्याचे मार्गदर्शन घेत आहेत.

या सर्वेक्षणात पर्यावरण संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. सर्वेक्षणात पक्ष्यांची 80पेक्षा जास्त घरटी आढळली. त्यातील 60 घरटी रिकामीच होती. काही घरटीही जुनी आहेत तर काही नैसर्गिकरीत्या खराब झाली आहेत. काही घरटी पक्षी अशीच सोडून गेले आहेत, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. ज्या घरट्यांमध्ये पक्ष्यांनी अंडी घातली आहेत त्यांची तज्ञांकडून पाहणी केली जात आहे. ती अंडी इन्क्युबेटरमध्ये काढली जाऊ शकतात आणि पुनर्रोपणानंतर ती पुन्हा घरट्यांमध्ये ठेवली जाऊ शकतात. ज्या घरट्यांमध्ये पिल्ले आहेत ती मोठी होऊन उडून जाईपर्यंत त्यांना हलवता येणार नाही. अशी घरटी असलेली झाडे ही पिले उडून गेल्यानंतरच उखडावी लागतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. मेट्रो-4साठी सुमारे 400पेक्षा जास्त झाडे उखडली जाणार आहेत.