
मुंबई प्रतिनिधी । मुंबई
गेली चार वर्षे मोनोरेलचा ढिसाळ कारभार निमूटपणे पाहणाऱ्या एमएमआरडीएने अखेर मलेशियन स्कोमी कंपनीला कंत्राटातून हद्दपार करीत मोनोरेलचे व्यवस्थापन गुरुवारी आपल्या ताब्यात घेतले. आता मोनोरेलचा कारभार रुळावर आणू, असे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. कंपनीला बँक गॅरंटी म्हणून दिलेली 200 कोटींची रक्कमही प्राधिकरण आपल्या ताब्यात घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोनोरेलचा चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल हा 19.5 कि.मी.चा टप्पा बांधकामासह व्यवस्थापन पाहण्यासाठी मे. लार्सन ऍण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनीअरिंग कंपनीला 2008 मध्ये 2,460 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. 2029 पर्यंत हे कंत्राट होते. कंपनी डबघाईला आल्याने 2015 मध्ये 67 कोटी तर 2017 च्या फेब्रुवारी आणि ऑक्टोबर महिन्यात 16.34 कोटी रकमेची मदत केली होती. सात वेळा मुदतवाढ देऊनही व्यापक जनहितासाठी योग्य देखभाल आणि समाधानकारक सेवा न पुरविल्याने कंपनीने कराराचा भंग केल्याची नोटीस 7 डिसेंबर रोजी देण्यात आली. त्यास उत्तर देण्यास कंपनी अपयशी ठरल्याने हा करार दुर्दैवाने रद्द करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.
मोनोरेलला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आग लागल्यापासून बंद ठेवले गेले होते. त्यानंतर तिला पुन्हा सुरू करताना स्कोमी कंपनीने तिकीट दर वाढविण्याची धमकी दिली होती. केवळ चार गाड्यांवर मोनोचा पहिला टप्प्या सुरू असून यार्डात नादुरुस्त सहा गाड्यांच्या स्पेअर पार्टससाठी तिने वेळेत टेंडर काढले नाही, दुसरा टप्पा वेळेत सुरू केला नसल्याचेही राजीव यांनी स्पष्ट केले.
दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात?
मोनोरेलकडे चारच गाड्या सुस्थितीत आहेत, तर सहा गाड्या नादुरुस्त असून त्यापैकी चार गाड्या आतापर्यंत रुळांवर आल्या पाहिजे होत्या. नादुरुस्त गाड्यांच्या दुरुस्तीकरिता लवकरच टेंडर काढले जाणार आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यांत चार गाड्या सुरू होतील. आणखी दहा नवीन गाड्यांची गरज असून त्यापैकी पाच गाड्यांसाठी प्रथम टेंडर काढले जाईल. त्यानंतर वडाळा ते जेकब सर्कल (सात रस्ता) हा दुसरा टप्पा सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
195 कामगारांना सामावून घेणार
स्कोमी कंपनीच्या 195 हिंदुस्थानी कामगारांना सामावून घेण्यात येणार असूनही शुक्रवारपासून व्यवस्थापन आमच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोंबडी आधी की अंडे आधी…
मोनोरेल चालविण्यासाठी मलेशियातील स्कोमी इंजिनीअर कंपनीकडे 2008 मध्ये कारभार सोपविण्यात आला. प्रत्यक्षात 2 फेब्रुवारी 2014 मध्ये चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा सुरू झाला, परंतु जेथे विरळ मनुष्यवस्ती आहे अशा सुनसान पट्ट्यातून हा मार्ग आखल्याने मोनोला प्रवासीच लाभले नाहीत. वडाळा ते सात रस्ता दुसऱ्या टप्प्यात प्रवासी मिळण्याची आशा होती. त्यासाठी आणखी गाड्या हव्या होत्या. नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी स्पेअर पार्टस् नव्हते. त्यामुळे पैशांअभावी नव्या पार्टस्साठी टेंडर निघाले नाही आणि प्रवासी देणारा दुसरा टप्पा सुरू झालाच नाही. त्यामुळे प्रवासी नाही म्हणून उत्पन्न नाही व उत्पन्न नाही म्हणून प्रवासी नाही अशी कोंबडी आधी की अंडे अशी मोनोची अवस्था झाली आहे.





























































