चेन स्नॅचिंग करणाऱ्यांना पकडले म्हणून जमावाचा पोलिसांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भिवंडी

हळदी समारंभ उरकून पतीसोबत घरी जाणाऱ्या महिलेचे सहा तोळ्याचे दागिने दबा धरून बसलेल्या चोरट्याने खेचले. पोलिसांनी या चोरट्याला पकडल्याने संतप्त झालेल्या एका जमावाने पोलिसांवरच हल्ला केल्याची संतापजनक घटना माणकोली नाका येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या खासगी गाडीवरदेखील दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

भरोडी येथे राहणाऱ्या सुवर्णा भगत या आपले पती प्रदीप यांच्यासोबत हळदी समारंभासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर बाईकवरून जात असताना दबा धरून बसलेल्या नीलेश भोईर याने सुवर्णा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, अन्य दागिने खेचून पोबारा केला. पतीने ताबडतोब आरडाओरड करताच माणकोली नाका येथे एका टेम्पोचालकाने नीलेश याची बाईक अडवली व त्याला रोखले. तसेच आजूबाजूच्या नागरिकांनीदेखील चोरट्याला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नारपोली पोलीस ठाण्याचे साध्या गणवेशातील पोलीस पथक ब्रिजा कारमधून चालले होते. हा प्रकार दिसताच पोलिसांनी त्यांची कार थांबवून चोरट्याला ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात नीलेश याला घेऊन जात असल्याचे समजताच लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांनी धाव घेतली. त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमाव करीत होता, मात्र त्यास नकार दिल्याने पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. त्याचवेळी संतप्त जमावाने कारवर दगडफेक केली. या हल्ल्याप्रकरणी ऋषिकेश जोशी, सूर्याजी दिवेकर, प्रफुल्ल पाटील, परेश पाटील, राहुल पाटील, मनोज भगत यांना अटक केली आहे.