
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर आज सकाळी झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱयांवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यामध्ये पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली असून, जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड करीत दुपारपंर्यंत सहाजणांना अटक केली आहे.
बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. मारहाण करणाऱया टोळक्याची पोलिसांनी धरपकड सुरू करत दुपारपर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले होते.
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वेमार्गालगत आज सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदरचा मृतदेह कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने कोतवाली पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करत असताना मृतदेह पाहण्यासाठी उड्डाणपुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वाहनचालकांनी पुलावरच त्यांची वाहने उभी केली होती. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्याचवेळी पोलीस कर्मचारी बाळासाहेब भापसे आणि अविनाश बर्डे हे एक नोटीस बजावण्यासाठी कल्याण रोडने जात होते. उड्डाणपुलावर एकाने रस्त्यातच गाडी उभी केल्याचे पाहिल्यावर त्यांनी त्या गाडीधारकास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा त्याला राग आला आणि त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेत 10 ते 12 जणांनी दोघा पोलिसांना बेदम मारहाण केली. दोघांपैकी एकाला खासगी रुग्णालयात, तर एकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी तोफखाना पोलीस आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत दुपारपर्यंत 6 जणांना पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































