मॉब लिंचिंग प्रकरण- कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही- प्रकाश जावडेकर

मॉब लिंचिंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. अवघ्या देशभरातून या वृत्ताचा निषेध करण्यात येत होता. मात्र, असं काहीही घडलं नसल्याचं उघड होत आहे.

देशभरात सुरू असलेल्या मॉब लिंचिंग अर्थात सामूहिक हिंसाचारावर देशभरातल्या 49 नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै 2019मध्ये पत्र लिहिलं होतं. यात रामचंद्र गुहा, कोंकणा सेन शर्मा, श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, मणिरत्नम अशा अनेकांचा समावेश होता. या पत्रात जय श्री राम या घोषणेचा हिंसाचार घडवून आणण्यासाठी गैरवापर होत असल्याचं म्हटलं होतं. देशभरात या घोषणेच्या आधारे सामूहिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

हे पत्र लिहिणाऱ्या या 49 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झालं होतं. त्यावरून जनक्षोभ उसळला होता. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा सूर उमटलेला दिसत होता. मात्र, कोणत्याही व्यक्तिविरोधात असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या