
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
हंटस्मन या वैविध्यपूर्ण रसायनांची निर्मिती आणि विपणन करणाऱ्या जागतिक कंपनीने शुक्रवारी फ्रिडम फॉर यू फाउंडेशनच्या सहयोगाने नवी मुंबईतील यादव नगर येथे मोबाईल वैद्यकीय रुग्णवाहिका सादर केली. आणीबाणी प्रतिसाद केंद्र म्हणून देखील ही रुग्णवाहिका काम करणार असून या विभागात विनामूल्यप्राथमिक आरोग्य सुरक्षा पुरविणे आणि मूलभूत वैद्यकीय सुविधांची उपलब्धी सुधारणे हा तिचा उद्देश आहे.
मोबाईल वैद्यकीय रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि परिचारिका असतील हे रक्तातील साखरेची पातळी, इसीजी आणि रक्तदाब यांची तपासणी करतील. त्याखेरीज येथे तातडीने जागेवरच रक्ताची चाचणी आणि अन्य सोपी निदाने करण्यात येतील. दररोज 60 हून अधिक रूग्णांवर उपचार करण्याचे या रुग्णवाहिकेचे ध्येय आहे. एवढेच नव्हे तर सरकारच्या विविध आरोग्य योजनांबाबत जागृती करणे, वैद्यकीय विम्याचे लोकांना शिक्षण देणे, आरोग्य व तंदुरुस्ती शिबिरे आयोजित करणे आणि रोगाला प्रतिकार करून उत्तम आरोग्य जगण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्रे आयोजित करणे आदीची देखील या रुग्णवाहिकेची आगामी योजना आहे. ही रुग्णवाहिका शेप (SHEP) अर्थात शालेय आरोग्य आणि स्वच्छता शिक्षण प्रकल्प (SCHOOL HEALTH / HYGIENE EDUCATION PROJECT ) देखील राबवणार असून त्यामध्ये झोपडी वस्तीतील शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले जाईल. दर महिन्याला किमान दोन शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.































































