
सामना ऑनलाईन । इंदूर
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री धार गावात 12 वर्षीय मुलाचा मोबाईलच्या बॅटरी स्फोटामुळे मृत्यू झाला होता. त्याने मोबाईलची बॅटरी साधारण वेळेपेक्षा जास्त चार्ज केल्याने हा अपघात झाला. लखन सिंगर असे मृत बालकाचे नाव असून, दुर्घटनेच्या वेळी लखन घरी एकटाच होता. हा स्फोट इतका भीषण होता की लखनचा जागीच मृत्यू झाला.
लखनचे काका मुकेश हे घराच्या जवळच राहत असल्याने स्फोटाचा आवाज ऐकता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता आणि लखन जखमी अवस्थेत पडला होता. त्याचा चेहरा विदृप झाला होत आणि त्याच्या हाताचे बोटही तुटले होते. जखमी लखनचा रक्तस्त्राव वाढल्यानेत्याचा काकाने त्वरीत लखनच्या वडिलांना बोलावून घेतले व त्याला जवळच्या रुग्णलायत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मोबाईल तज्ज्ञ रुपेश द्विवेदी यांनी स्वस्तातले फोन किंवा बॅटरी विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारच्या फोनमुळे आधीही अनेक अपघात झाले आहेत तसेच मृत्यू झाले आहेत असेही तज्ज्ञांनी नमूद केले.
























































