मुंबईच्या सराईत मोबाईल चोरास हडपसर पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हडपसर

ओएलएक्स या खरेदी विक्रीच्या वेबसाइटवर माहिती मिळवून किंमती मोबाइल विकण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सावजाला शोधून त्यांचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल विकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना शोधून मोबाईल खरेदी करण्यासाठी चोरटा त्यांना बोलावायचा. नंतर त्यांच्याच गाडीवर बसून एका ठिकाणी गाडी थांबवून बहिणीला मोबाइल दाखवून येतो, असे सांगून मोबाईल घेऊन तो धूम ठोकयचा. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या सराईत मोबाईल चोरट्याला हडपसर पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्याच्याकडून अंदाजे दोन लाख वीस हजार रुपये किंमतीचे आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मुशर्रफ बिलाल शेख (वय २० वर्षे रा. सांताक्रूझ झोपडपट्टी मुंबई) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत आठ ठिकाणी मोबाइल चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत.

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अशा पद्धतीने दोन मोबाइल चोरीला गेल्याने पोलीस तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे व कर्मचारी अमित कांबळे याने दोन्ही गुन्ह्यातील साम्य ठिकाण व चोरी करण्याची पद्धती ओळखली. हडपसर पोलिसांनीच ओएलएक्स या साइटवरच मोबाईल विक्रीसाठी सापळा रचला. त्या सापळ्यात गेली अनेक महिने पोलिसांना गुंगारा देणारा हा मोबाइल चोर हडपसर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता चोरीचे आठ मोबाइल मिळाले. हडपसर परिसर व पुणे शहरातील विविध ठिकाणी त्याने मोबाइल चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण,प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक मंगेश भांगे,पोलीस हवालदार नवले,संपत अवचरे,अनिल कुसाळकर,अमित कांबळे,शाहीद शेख,ज्ञानेश्वर चित्ते यांनी या गुन्हय़ाचा तपास केला.