
पुणे रेल्वे स्थानक परिसरासह पीएमपीएल बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 50 हजारांचे 63 मोबाइल जप्त केले आहेत. यापुर्वी आरोपींविरूद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कुंदन रमेश शिंदे (वय 28, रा. कात्रज) आणि अजित गणेश पवार (वय 25, रा. पुणे स्थानक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पीएमपीएल बसस्थानकाजवळ दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे चोरीचे मोबाइल असल्याची माहिती पोलीस शिपाई कादिर शेख आणि समीर पटेल यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या पथकाने कुंदन आणि अजित याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीत 63 मोबाइल आढळून आले. ही कामगिरी अपर आयुक्त रामदास पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, उपनिरीक्षक विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे, पठाण, कादिर शेख, समीर पटेल, गजानन सोनुने, निखिल जाधव, किशोर वग्गू, संजय जाधव, साधना ताम्हाणे, नागनाथ राख यांनी केली.
गर्दीचा फायदा घेत मोबाइलची चोरी
पुणे स्थानकासह पीएमपीएल बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 63 मोबाइल चोरले होते. त्याची विक्री करण्यासाठी दोघेही ग्राहकांची वाट पाहत असताना पथकाने त्यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध पुणे शहर आणि लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
























































